Sunday, May 13, 2007

’चिऊ-काऊचा घास’

’चिऊ-काऊचा घास’

हिशेब लावतेय गं आई आज,
सगळी प्रश्नचिन्हं घेऊन बसलेय पुढ्यात,
आणि प्रत्येक प्रश्नचिन्ह फ़क्त तुलाच
उत्तर सुचवून जातंय.
का तेव्हा असा घास अडला नाही गं ओठी?
कधी उशीर झाला तरी,
तुझं-माझं ताट बाजूला ठेऊन,
तू तशीच झोपून जायचीस.
आणि मी भूर उडून आले की,
तू चिऊ-काऊचा घास भरवायचीस.
तुझ्यासाठी मी कायमचीच चिऊ ना गं?
या एकेका घासात तू केलेल्या मिन्त्या,
ऎकवलेली गोष्ट आणि
तू आकाशात दाखवलेली ती उडणारी चिऊ...
मलासुद्धा पन्ख यावेत वाटायचे तेव्हा!
कालच ना गं तू मला उडायला शिकवलसं?
आणि भूर उडताना सान्गायचीस-
आज त्या क्षितिजापर्यन्त जा,
आणि पुन्हा ये, चिऊ-काऊच्या घासापर्यन्त.
पण आज उडता-उडता आकाशही
कधी मागे पडले,कळलेच नाही.
मला अजून पलीकडे जायचंय,
तू भरवलेला प्रत्येक चन्द्र,
पन्खान्च्या कवेत घ्यायचाय.
...बाकी मजेत आहे मी.
फ़क्त आता प्रत्येक घास
प्रश्नचिन्ह होऊन अडतो गं ओठावर,
तू जेवलीस ना गं?
का माझी वाट पाहून तशीच झोपून गेलीस?
भूर उडून आले असते गं,
पण आता खरच खूप अन्तर वाढलंय
आपल्या चिऊ-काऊच्या घासातलं.

रेश्मा
१३मे,२००७

3 comments:

Meenakshi Hardikar said...

आवडलं गं रेश्मा...

Swati said...

sundar

Mayur Lankeshwar said...

vaa! madam...
chiu kaau chaa ghaas...
shabdaaMchaa ghaas ghetalaayas chakka.

http://shabdaateet.wordpress.com/